मित्राबरोबर, मोटरसायकलीवर स्वार होऊन पॅसिफिक किनारपट्टीने, लॅटिन अमेरिकेच्या सफरीवर निघाला. ही सफर त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.

'आज़ाद परिंदा' लॅटिन अमेरिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिका खंडातील, अर्जेंटीना या देशातील एक तरुण, १९५१ साली आपल्या मित्राबरोबर, मोटरसायकलीवर स्वार होऊन पॅसिफिक किनारपट्टीने, लॅटिन अमेरिकेच्या सफरीवर निघाला.
ही सफर त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. लॅटिन अमेरिका खंड म्हणजे अनेक छोट्यामोठ्या देशांचा समूह. युरोपियन साम्राज्यवादाचे बळी असलेले, हे सर्व देश शोषण, दारिद्र्य, बेरोजगारी आदी समस्यांनी ग्रस्त. शेतकरी, खाण कामगार यांची पूंजीपती वर्गाने चालवलेली भयंकर पिळवणूक बघून तो तरुण कमालीचा अस्वस्थ झाला. अत्यंत व्यथित मनाने तो सफरीवरुन परतला. सफरीवरुन परल्यावर त्याने डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिग्रीही संपादन केली.
परंतु लॅटिन अमेरिकन जनतेचं खुणावणारे दु:ख, दैन्य, शोषण त्याला स्वस्थ्य बसू देईना. त्यांच्या या अरिष्टाचं कारण साम्राज्यवाद व भांडवलशाही आहे, हे त्याने ओळखले. साम्राज्यवाद व भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त झाल्याखेरीज, त्यांचं अरिष्ट संपणार नाही. म्हणून साम्राज्यवाद व या हे हत्याहीत एल्गार पुकारला पाहिजे असा त्याने मनाशी निश्चय केला. वैद्यकीय सेवेपेक्षाही जनतेची गुलामगिरीतून मुक्ती त्याला अधिक निकडीची वाटली. रोग्याच्या त्वचेवरील चट्ट्यांपेक्षा या त्वचारोगतज्ज्ञाला लॅटिन अमेरिकेवरील गुलामीचे चट्टे ही भयंकर गंभीर गोष्ट वाटली.

परिणामी डॉक्टरीची प्रॅक्टिस करण्याऐवजी त्याने क्रांतीचं रणशिंग फुंकले. तो तरुण म्हणजे अर्नेस्टो चे गव्हेरा. 'चे' हे विस्मयादिबोधक (उद्गारवाचक) अव्यय आहे. आनंद, दु:ख, आश्चर्य, तिरस्कार, हळहळ इत्यादी भावना व्यक्त करणारे 'चे' हे विस्मयादिबोधक अव्यय म्हणजे संवेदनशीलतेचे प्रतीक. परिणामी संवेदनशील मनाच्या अर्नेस्टोने, ते अव्ययच टोपणनाव म्हणून धारण केले आणि 'चे' या टोपणनावाने तो जगप्रसिद्ध झाला. जगभरातल्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला. त्याला त्याच्यासारखाच क्यूबाचा एक तरुण भेटला, तो म्हणजे फिडेल कॅस्ट्रो. मार्क्सवादी विचारांनी झपाटलेला कॅस्ट्रो वकील आणि चे डॉक्टर. या वकील आणि डॉक्टराची चांगली जोडी जमली.
कॅस्ट्रोने क्युबातील भांडवलशाही राजवटीविरुद्ध लढा पुकारला होता. या लढ्यात चे त्याच्या खांद्याला खांदा लावून लढला. लढा यशस्वी झाला (१९५९). कॅस्ट्रो क्यबाचे राष्ट्रप्रमुख झाले. तर चे या आपल्या दोस्ताला त्यांनी अर्थमंत्री केले. पण... वो हुस्न के जलवे हों या इश्क़ की आवाज़ें आज़ाद परिन्दों की रुकती नहीं परवाज़ें जाते हुए क़दमों से आते हुए क़दमों से भरी रहेगी रहगुज़र जो हम गए तो कुछ नहीं इक रास्ता है ज़िन्दगी जो थम गए तो कुछ नहीं ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं साहिर यांच्या या काव्यपंक्तीप्रमाणे चे हा आज़ाद परिंदा होता. कोणतीही प्रलोभनं त्याच्या आकाश भराऱ्या रोकू शकत नव्हती. रस्ता हेच त्याचं जीवन होतं. थांबला तो संपला हे जीवनाचं मर्म त्याला कळलं होतं. अजून लॅटिन अमेरिका गुलामगिरीतच होता. तेथील देशात क्रांतीची मशाल त्याला पेटवायची होती. त्यामुळे मंत्रीपदाच्या हस्तीदंती पिंजऱ्यात त्याचा जीव रमणं शक्यच नव्हतं.
एकेदिवशी बाईकवर स्वार होऊन तो आज़ाद परिंदा पिंजऱ्यातून उडून गेला. मग हा क्रांतीदूत वेगवेगळ्या देशात क्रांतीचा सांगावा पोहचवत राहिला. त्यामुळे भांडवलशाही व साम्राज्यवादी देशांच्या डोळ्यात तो खुपू लागला आणि १९६७ साली वयाच्या ३९ व्या वर्षी बोलिव्हियाच्या जंगलात त्यांच्या गोळीचं लक्ष्य बनून हुतात्मा झाला. धुरंदर, बिलंदर, कलंदर चे आज जगातल्या तरुणाईचा लाडका आयडॉल आहे. तर त्याचं चित्र हे जगात सर्वात लोकप्रिय चित्र बनलं आहे. या आज़ाद परिंद्याला जयंतीदिनी क्रांतिकारी लाल सलाम!





