दिलदार राजा शाहु महाराज !

हिंदीत एक म्हण आहे, 'प्यासा कुएँ के पास जाता है, कुआँ प्यासे के प्यासे के पास नहीं जाता.'

अर्थात –

तहानलेला आडाकडे जातो, आड तहानेल्याकडे जात नसतो. पण शाहू महाराजांनी या म्हणीला सन्माननीय अपवाद प्रस्तुत केला होता. बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन आले ही गोष्ट कानी पडताच, एका महाराच्या मुलाची ही कर्तबगारी ऐकून, राजांचा अभिमानाने उर काय भरुन येतो नि ते मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बाबासाहेबांना शोधत, त्यांच्या घरी काय जाऊन पोहचतात नि बाबासाहेबांना कडकडून काय भेटतात. आजच्या तथाकथित राजांचं वर्तन पाहता हे स्वप्नवत वाटतं. खरंच शाहू राजांच्या या दिलदारीला तोड नाही. उदार राजे अनेक झालेत, पण त्यांच्या औदार्यालाही अहंपणाची सूक्ष्म किनार होतीच.

पण शाहू राजांनी अहंपणा औषधालाही शिल्लक ठेवला नव्हता. कारण आपण शिवरायांच्या नुसत्या गादीचे नव्हे, तर वैचारिक वारसदार आहोत, याचं क्षणभरही त्यांनी विस्मरण होऊ दिलं नव्हतं. कॉ. शरद् पाटील म्हणतात, 'जात ही जाणीवेतून नव्हे तर नेणीवेतून हद्दपार झाल्याखेरीज जात्यन्त होणार नाही.' शाहू महाराजांनी जातीला नेणीवेतून हद्दपार केलं होतं. म्हणूनच मानगावच्या परिषदेत त्यांनी बाबासाहेबांना बहुजनांचा नेता म्हणून घोषित केलं. हे त्यांच्या जात्यंतक नेणीवेचं आणि सुपाएवढ्या काळजाचं प्रतीक होतं. स्वतःच्या राजपदाचा वा उच्चकुलाचा अभिमान न बाळगता एका अतिशूद्राकडे बहुजनांचं धुरीणत्व सोपवून, व आपल्या भगिनीचा आंतरजातीय विवाह करुन, त्यांनी आपल्या जातीय अस्मितेचं असं मर्दन केलं, की तिला नेणीवेच्या सांधीकोपऱ्यातही, लपायला जागा ठेवली नाही.

ही गोष्ट असामान्य व ऐतिहासिक अशी आहे. अहंकारमर्दन ही गोष्ट सोपी नाही. कारण दुसऱ्याने तो केला, तर आमचा संताप अनावर होतो, नि स्वतः करायचा म्हटला, तर जात, पद, प्रतिष्ठा ताप करतात. नेतृत्व, पद, प्रतिष्ठा प्राप्तीसाठी स्वाभिमान गहाण टाकून, दीनवाणे होत, राजकीय पक्षांची दारं पूजताना मात्र, जातीच्या अस्मितेचं आम्हाला सोयिस्कर विस्मरण होतं. पदप्राप्ती नंतर मग अस्मितेची झालेली ही झीज भरुन काढण्यासाठी, काही जण, इतिहासाच्या अभ्यासकांना हाताशी धरुन, इतिहासात आपली नाळ कोण्या राजे, सरदार, सामंत, वतनदार घराण्यांशी होती का, याचा शोध घेतात. सभासमारंभात ते फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेत सामाजिक न्यायाचा उद़्घोष करतात आणि मंचावरुन उतरले की सामाजिक न्यायाच्या कायद्यांना खो घालतात. समता फक्त उक्तीत असून चालत नाही ती रक्तात अनं कृतीतही असावी लागते.

तेव्हा सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना होऊ शकते. शाहू राजांमध्ये ती तशी होती म्हणूनच त्यांनी सामाजिक न्यायाचे कायदे करुन व ते अंमलात आणून, फुले-आंबेडकरांनी पेटवलेली सामाजिक न्यायाची मशाल तेवत ठेवली. उमदेपणाची मिसाल फक्त मैत्रीतच नव्हे, तर शत्रुत्वातही कायम करणारा राजा! शक्ती, बुद्धी आणि न्याय यांचा अभूतपूर्व संगम असलेला, असा रयतेचा राजा पुन्हा होणे नाही!

या कल्पवृक्षाला सादर अभिवादन! त्रिवार मुजरा!!!

सुभाषचंद्र सोनार

राजर्षी !!

हजारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा हाच राजा.

वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.

आजच ह्या राजाला का आठवायच ?

जेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा ‘ परवडत नाहीत ‘ म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा मंजूर करून अंमलात आणणारा हा राजा आठवायचा.

जेव्हा शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग, शाळा उघडायला सढळ हस्ते मदत करणारा राजा आठवायचा.

जेव्हा दलित समाजातल्या माणसाला घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून मारहाण केली जाते तेव्हा शंभर वर्षापूर्वी दलित माणसाला आपल्या गावात हॉटेल काढून देऊन तिथे चहा प्यायला जाणारा राजा आठवायचा.

जेव्हा ऑनर किलिंग सारखा हिडीस प्रकार बोकाळलेला असताना, पोटच्या लेकरांचे जीव घेणारे हैवान असताना शंभर वर्षापूर्वी आपल्याच घरात मराठा धनगर विवाहाला पुढाकार घेणारा राजा आठवायचा.

जेव्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फीचे पैसे सरकारने दिले नाहीत म्हणून पदवी प्रमाणपत्र मिळायला अडवल जात तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा राजा आठवायचा.

पु.लं.देशपांडे एक अवलिया

जेव्हा महाराष्ट्रात लेकीबाळी हंडाभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर पायपीट करतात तेव्हा दूरदृष्टी दाखवून धरण बांधून सिंचनाची सोय करणारा राजा आठवायचा.

जेव्हा लोकशाही मार्गाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्था राबवणे अपेक्षित असलेल सरकार भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात दंग होत तेव्हा मर्यादित अधिकार आणि संसाधन असताना लोककल्याण साधणारा राजा आठवायचा.

पिढीजात वारसा, संपत्ती काहीही पाठबळ नसताना केवळ ज्ञानाच्या जोरावर संपत्ती आणि अधिकार मिळवता येतो हे सांगणारा राजा आठवायचा.

ज्या संस्थेत अहमदनगर जिल्ह्यातली लाखो मुल शिकलीत आणि आजही ती संस्था शंभर वर्षाची झाल्यावर लाखो मुल दरवर्षी शिकतात , त्या संस्थेत शिकण्याच भाग्य मला लाभल , त्या संस्थेची पायाभरणी करणारा राजर्षी !!

राजर्षी शाहू महाराज !!
त्रिवार मुजरा !!

आनंद शिंदे

भारतीय सामाजिक क्रांतीमधील एक अग्रणी राजर्षि छ. शाहू महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करणाऱ्या विशेष लेखाचा पहिला भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👉👉👉 राजर्षी शाहू महाराज: परिवर्तनाच्या अंतःकरणाचा वेध घेणारा द्रष्टा )

Leave a comment