
राजर्षि शाहू महाराज… लोकराजा ही पदवी ज्या एका राजाला शोभून दिसते तो महाराष्ट्राचा शाहूराजा. ज्याला पुढे साऱ्या देशातील प्रागतिक विचारसरणीने आपलेसे केले. कोल्हापूर सारख्या एका छोटया संस्थानाचा राजा असणारा हा पुरुष संबंध महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पातळीवर देखील सन्माननीय ठरला. याचे कारणच मुळी हा राजा काळाच्या पुढे जाऊन पावले उचलणारा मनुष्य होता. ऐषारामात लोळून ज्याला आपल्या पिढयानपिढयाची सोय करता आली असती अशी सगळी अनुकूल परिस्थिती अवतीभवती असताना देखील हा राजा आपल्या रयतेच्या उध्दाराकरता अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिला. यामध्येच याचे वेगळेपण व मोठेपण दिसून येते. भारताच्या इतिहासात राजे अनेक झाले, पण अपवाद वगळता कुणालाही आठवले जात नाही. अपवाद म्हणून ज्या राजांच्या कारभाराचे दाखले अगदी आजही द्यावे लागतात अशा राजांच्या मध्ये शाहूराजाचा समावेश होतो. एका छोटया संस्थानाचा हा राजा ‘ लोकराजा आणि राजर्षी ‘ या पदव्यांनी गौरविला जातो, यामध्येच हे मोठेपण पहावे लागते. लोकराजा याचा सरळ अर्थ असा की, लोकांच्या हिताचा कारभार करणारा राजा. आणि राजर्षी याचा अर्थ असा की,राजा असूनही जो ‘विश्वस्त योग्याप्रमाणे उपभोगशून्य स्वामी‘ म्हणून कारभार करतो, असा राजा. शाहूराजाला या दोन्ही पदव्या अगदी रास्त शोभतात.
२६ जून १८७४ रोजी जन्माला आलेल्या ‘यशवंतराव‘ या मुलाचे दत्तक विधानांनंतर झाले ते शाहू महाराज. १८९४ साली, अर्थात वयाच्या केवळ विसाव्या वर्षी, संस्थानाचे अधिपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. तत्पूर्वी युवराज म्हणून शिक्षणाचे सोपस्कार पार पाडलेले होते. कर्नल फेरीस सारखा मार्गदर्शक त्यांना मिळालेला होता. काही राज्ये फिरुन युवराज शाहूनी आपली रयत आणि भारतीय जनतेचे ‘अवलोकनार्थ दर्शन‘ घेतलेले होते. यामधून मनाच्या काही निश्चित अशा धारणा बनलेल्या होत्या. काही नवे संस्कार झालेले होते. याच दरम्यान लक्ष्मीबाई यांच्याशी विवाह देखील घडून आलेला होता. अशा काही पार्श्वभूमीवर शाहूराजा हा वयाच्या विसाव्या वर्षी राजा म्हणून कारभार हाकण्यास सक्षम झालेला होता. आपल्या राज्यकारभाराच्या पहिल्याच दिवशी शिवरायांची आठवण ठेवून शाहूनी आपला कारभार कोणत्या दिशेने जाणाराआहे याची चुणूक दाखवून दिली. आपल्या अधिकारात येणाऱ्या सर्व बाबी समजून घेऊन शाहूनी कारभारातील आपले प्रभुत्व सिध्द केले. २८ वर्षे त्यांना राजा म्हणून अधिकारावर राहण्याचा अवधी मिळाला आणि या अठ्ठावीस वर्षांचा प्रत्येक क्षण दीनदुबळ्यांच्या उध्दारासाठी या राजाने वापरला. राजा म्हणून कोणतीही ऐशबाजी न करता जनतेचा ‘विश्वस्त‘ म्हणून हा राजा कार्यरत राहिला. शिवाजीराजांचा आदर्शस्थान म्हणून त्यांना अभिमान होता आणि आपल्या प्रत्येक कार्याला या शिवअभिमानाची जोड देत शाहूराजा काम करु लागला. कोल्हापूर सारखे एक छोटे संस्थान वाट्याला आलेले, ब्रिटीश हे संस्थान खालसा करण्यासाठी टपलेले, आजूबाजूची सामाजिक परिस्थिती आव्हान म्हणून समोर उभी आहे आणि बहुजन समाजाच्या उध्दाराकरता मन तळमळत आहे, अशा वेगवेगळ्या कोंडीत हा राजा “बहुजन हिताय, बहुजन सुखाय“ असा राज्यकारभार करु शकला, हे सारे अचंबित करणारे आहे.

कोल्हापूर सारख्या एका छोटया संस्थानाला कलापूर बनवण्याची किमया या राजाने अलगद करुन दाखवली. उस्ताद अल्लादियाँ खाँ सारखा अजरामर गायक इथेच उभा राहिला आणि चित्रकार आबालाल रहिमान यांच्या कुंचल्याला इथेच वैभव प्राप्त झाले. बाबूराव पेंटर सारखे या देशातील पहिला ‘देशी चित्रपट कॅमेरा‘ बनवणारे कलावंत याच मातीत जन्मले आणि आपल्या आवाजाच्या सौंदर्याने जनतेला डोलायला लावणारे संगीतसूर्य केशवराव भोसले इथेच तर दिमाखात तळपले. शाहीर लहरी हैदर यांच्या पहाडी आवाजाला इथेच लोकमान्यता मिळाली आणि बालगंधर्वांची घडवणूक देखील याच मातीने केली. ही माती शाहूराजा नावाच्या एका अगाध मनुष्याने आपल्या कलाप्रेमाची साक्ष म्हणून जाणीवपूर्वक मळलेली होती. कलानगरी असणाऱ्या कोल्हापूरला पुन्हा एक वैभव प्राप्त करून देताना शाहूराजाने इथे मल्लविद्याही जोपासली. स्वतः एक उत्तम पैलवान असणारा शाहूराजा ‘मल्लविद्येचा पोशिंदा‘ म्हणून समोर आला आणि या कुस्तीपंढरीमध्ये एकाहून एक सरस पैलवान दिसू लागले. यामध्ये देवाप्पा धनगर आणि शिवाप्पा बेरड सारखे बुरुजबंद पैलवान होते तसेच, दिपासिंग पतियाळा पासून चंदन पैलवानांपर्यंत परप्रांतीय पैलवान देखील या कुस्तीपंढरीला ‘शड्डू‘ ठोकण्याची संधी घेत होते. पुढे १९५२ मध्ये हेलसिंकीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र भारताला पहिले पदक खाशाबा जाधव मिळवून देऊ शकले ते या कुस्तीच्या सशक्त परंपरेच्या आधारावरच.
आणि कुस्तीनगरी असणारी कोल्हापूरनगरी शाहूराजानेच ‘उद्योगनगरी‘ म्हणून नावारुपाला आणली. श्री शाहू छत्रपती मिल इथेच दिमाखात एभी राहिली आणि उद्यमनगरी म्हणून औद्योगिक नगरीने इथेच स्वतःला अलंकृत केले. इथेच सहकारी संस्थांचे जाळे उभारले आणि इथेच व्यापारी पेठा उभ्या राहिल्या. मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय देखील इथे आकाराला आणि सुगंधित तेलाची निर्मिती देखील याच नगरीत झाली. लाकडापासून तयार होणारा ‘काष्ठार्क उद्योग‘ इथेच सुरु झाला आणि प्रयोगशील असे चहाचे मळे देखील याच भूमीत उभे राहिले. ही सर्व ‘शाहूदृष्टी‘ होती.
कलानगरी, कुस्तीनगरी, उद्योगनगरी ही बिरुदे कमी पडली म्हणून की काय, शाहूराजाने आपल्या कार्याने या कोल्हापूर नगरीला ‘प्रबोधन नगरी‘ देखील बनवले. याच कोल्हापूरच्या मातीत जी माती शाहूविचाराने मळलेली होती, तिथेच जातीप्रथेचे उच्चाटन करणारी उदाहरणे शाहूराजाने करुन दाखवली. मागास घटकांना उध्दारासाठी आरक्षणाची सुरुवात १९०२ साली याच भूमीत झाली आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी कायदा इथेच तयार झाला. इथेच उभारलीत विविध जातींची वसतीगृहे आणि इथेच गुन्हेगारी जमाती म्हणून असणारा शिक्का कायद्याने नाहीसा झाला. इथेच खुद्द राजपरिवार अस्पृश्यांसहीत चहा घेऊ लागला आणि इथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व ऐतिहासिक माणगांव परिषदेत शाहूराजाने समोर आणले. ब्राम्हणी वर्चस्वाचा माज इथेच क्षात्रजगदगुरु नेमून मोडला गेला आणि वेदोक्ताच्या निमित्ताने याच नगरीत स्वाभिमानाच्या हक्काची लढाई खेळली गेली. त्यांच्या वेदोक्त प्रकरणातील भूमिकेविषयी काही सत्यशोधकांचा काहीसा आक्षेप होता, महर्षि विठ्ठल रामजी शिंद्यांनी ब्राह्मणेतर असला तरी नवा जगद्गुरू नेमण्याची गरज नाही, असा अभिप्रायही दिला होता. हे खरे असले तरी, धार्मिक क्षेत्रात लोकशाही प्रस्थापित करण्याचा आग्रह म्हणून शाहूराजांच्या या भूमिकेला महत्त्व आहे. कुलकर्णी वतन संपवण्याचे ऐतिहासिक काम इथेच घडून आले आणि ब्राम्हणेतर चळवळीच्या पहिल्या टप्प्याचे नेतृत्व याच नगरीने केले. याच कोल्हापुरात तत्कालीन देशातील सर्वात मोठया धरणाची सुरुवात राधानगरी धरणाच्या निमित्ताने झाली आणि पहिल्या देशीय हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. इथे रेल्वे देखील दिमाखात धावली आणि दुष्काळ निवारणाचा व प्लेग सारख्या राष्ट्रीय आपत्तीचा बीमोड करण्याचा आदर्श वस्तूपाठ याच नगरीत शाहूराजाने घालून दिला. १८९६च्या दुष्काळात संपूर्ण भारतात १० लाख लोक बळी पडले पण कोल्हापूर संस्थानात एकही बळी जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. याच नगरीत शाहूराजाने शिकारीसंबंधीचे निरनिराळया प्रकारचे नवीन तंत्रे विकसित केली आणि याच नगरीत परधर्म सहिष्णुतेचा अंगिकार करण्यास इथल्या रयतेला शिकवले.
(भारतीय सामाजिक क्रांतीमधील एक अग्रणी राजर्षि छ. शाहू महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करणाऱ्या विशेष लेखाचा पहिला भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👉👉 दिलदार राजा शाहु महाराज ! )
शाहुराजा हा नव्या समतावादी युगाचा आणि नव्या विचारधारेचा अंगिकार करणारा शासक होता. आपल्या रयतेशी संवाद करण्याची त्याची रीत अगदी न्यारी होती. रयतेतील विद्वान लोकांशी अत्यंत वेगळ्या भाषेत बोलणारा हा राजा आपल्या रांगडया प्रजेशी मात्र अत्यंत मायेची भाषा वापरायचा. विद्वानांकरता तो जसा विद्वान राजा होता तसाच रांगडया रयतेचा तो रांगडाच राजा होता. आपण ज्या रयतेच्या सिंहासनावर बसलो आहोत ते सिंहासन यापूर्वी शिवरायांनी भूषवलेले आहे याचे आयुष्य्भरचे भान या राजाला होते. सर्व पातळीवर आपली रयत ही सुखी समाधानी राहिली पाहिजे हे शिवरायांचे ब्रीद शाहुराजाने अंगिकारले होते. शाहुराजाचे मोठेपण त्याच्या कार्यातून दिसून येते. अनेक लोकोपयोगी, रचनात्म्क आणि विधायक कार्ये खूपच दाखवता येतात.पण तरीही शाहूराजाचे आकलन एका वेगळया पातळीवर करणे गरजेचे आहे.शंभर वर्षापूर्वी एका लहान संस्थानाचा राजा आपल्या विधायक शासनपध्दतीने रयतेच्या हिताची डोंगराएवढी कामे करतो आणि लोकराजा म्हणून सार्थ ठरतो ही बाब सामान्य् नाही. इंग्रजी शासनसत्ता हे संस्थान खालसा करण्यासाठी टपलेली असताना हा राजा आपल्या रयतेच्या सर्वांगीण प्रगतीचा जो ध्यास धरतो तो वाखाणण्याजोगा आहेच परंतु प्रत्येक शासकाला अनुकरणात्मक असाच आहे. शाहूराजाच्या वाटयाला देखील मोठमोठी कारस्थाने आली. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा रचल्या गेल्या, मारेकरी धाडून अख्खा राजपरिवार उडवण्याचा कट झाला, चारित्र्यावर हल्ले झाले, राजवाड्यावर रक्ताचे हात उमटवले गेले आणि काही भाग जाळण्याचा प्रयत्न देखील झाला. परंतु हा कणखर राजा डगमगला नाही की आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळला नाही. इंग्रजी राजसत्तेला थेट सुनावताना हा राजा सोगतो की, “एकवेळ राजगादी सोडावी लागली तरी चालेल, पण बहुजनोध्दाराचे जे कंकण हाती बांधलय ते प्राण गेले तरीही हा शाहु सोडणार नाही“. जगातील हा बहुधा एकमेव राजा असावा की जो, रयतेच्या न्याय्य हक्कासाठी आपले सिंहासन सोडण्याची तयारी दाखवतो. आपण आपल्या सामान्य रयतेच्या सिंहासनाचे स्वामी आहोत ही भावना जागवताना हा राजा गादीगिरद्यांवर लोळला नाही. रयतेच्या लोभाचे आपण विश्वस्त आहोत ही भावना त्यांच्या मनी कायम जागती राहिली. सत्तेच्या मोहापायी महाभारत घडल्याचे आपण पदोपदी पाहतो आणि हा जगावेगळा राजा मात्र सत्तेला ‘विश्वस्त‘ भावनेने जपतो हे उदाहरणच दुर्मिळ आहे. याचकरता सत्तेचा मोह शाहूराजाला बांधू शकला नाही की सत्तेची गुर्मी त्याला स्पर्श करु शकली नाही. सत्तेची मस्ती व सत्तेचे क्रौर्य अमानुष असते. माणसाचे जनावर होते तिथे. सतत कुणाला तरी तुडवण्याची भावना बळावत जाते. अशावेळी सत्तेची ही सारी अमानुष गणिते पूर्णपणे नेस्तनाबूत करुन शाहूराजाने आपले ‘ माणूसपण ‘जपलेच नाही तर वाढवले.
शाहुराजाची महानता आकळावी तरी कशी ? शाहूराजा जगला तो अवघे ४८ वर्षाचे आयुष्य. एवढया कमी वयात जनमानसाला एक वेगळे वळण देण्यात तो यशस्वी ठरला. देशभरात असणाऱ्या जवळजवळ साडेपाचशेहून अधिक संस्थानिकांमध्ये शाहूराजा हा अपवाद असा तारा होता. हे केवळ त्याने केलेल्या रचनात्मक कामामुळे नाही की एका संस्थानाचा सर्वागीण विकास करण्यासाठी देखील नाही.कोणतीही विधायक रचना ही नैतिक आशयाने संपृक्त झालेली नसेल तर त्या रचनेचा उपयोग भावी पिढयांना होत नसतो. कारण समाजाच्या गतिमानतेशी ही रचना मेळ खात नाही. शाहूराजा ज्या विधायक रचना उभ्या करतो ह्या मर्यादित स्वरुपाच्या नाहीतच. त्याची व्याप्ती खूप खोलवर जाऊन पहावी लागते. “माझी रयत इयत्ता तिसरी शिकली तरी मी माझी राजसत्ता तिच्या हवाली करायला आनंदाने तयार आहे,“ हे शाहूराजाचे बोल पुढील काळातील आपण स्वीकारलेल्या लोकशाही नामक रचनेशी जोडून पाहिले की त्याची अमर्याद अशी दृष्टी ध्यानात येते. जेव्हा परप्रांतीय मल्लांना हृया राजाचा सन्मान करण्यासाठी त्याला थेट कुस्तीच्या आखाडयात नेऊन बसवण्याची तयारी स्वखुशीने करावीशी वाटते तेव्हा या राजाने प्रांतवादाचा मुद्दा उखडून फेकलेला असतो. जेव्हा मागासांना त्यांचा नेता त्यांच्या जातीतीलच करण्याची सूचना करतो आणि बाबासाहेब हेच उद्या भारताचे नेतृत्व करणार असल्याची जाहीर ग्वाही देतो तेव्हा एकाचवेळी जातीनिर्मूलन करता करता दुसऱ्या क्षणी भारताच्या नेतृत्वाच्या मांदीयाळीत बाबासाहेबांसारखा प्रज्ञावंत मनुष्याची पारख करून समोर ठेवतो. टिळकांच्या बरोबर सामाजिक व सांस्कृतीक लढाई लढताना बहुजनांच्या हक्क व अधिकारांची चळवळ कोणत्या दिग्गज व्यवस्थेच्या विरोधात आहे याची चुणूक दाखवून अशा लढाईत उभा राहण्याचा बहुजनांच्या मनोनिग्रहाचा पायाच रचतो. संस्थानिक असूनही जेव्हा हा राजा फासेपारध्यांना आपल्या बरोबरीने जेवायला बसवतो तेव्हा माणुसकीचा गहीवर किती खोलवर व्यवहारात न्यावा लागतो याचा दाखलाच समस्त समाजाला घालून देतो. मृत्युच्या अगोदर केवळ दोन महिने महात्मा गांधीच्या बरोबर कुरुक्षेत्रावर भेट घेतो तेव्हा बहुजन समाजाला भविष्याचा रस्ता दाखवून ठेवतो. मृत्युच्या रात्री प्रबोधनकारांकडून सातारच्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून घेण्याची वचनबध्दता जेव्हा शाहूराजा घेतो तेव्हा बहुजनांच्या उध्दाराचे हाती घेतलेले कंकण किती बळकट आहे याची ग्वाहीच देऊन जातो. शाहुराजा आकळायचा असेल तर त्याच्याच अंत:करणात प्रवेश करुन पहावा लागतो. कारण एकाचवेळी आपल्याला माणसातील राजा आणि राजातील माणूस यांचा शोध घ्यायचा असतो.

शाहुराजाच्या मृत्युनंतर महात्मा गांधी यांनी श्रध्दांजली वाहताना असे म्हटले होते की, शाहूराजाने स्वराज्याचा पाया घातला. गांधीजी जेव्हा असे शब्द वापरतात तेव्हा त्या शब्दाचे अर्थ आपणास नीटपणे समजले पाहिजेत. स्वराज्याचा पाया ज्या तीन मूलभूत गोष्टींवर आधारलेला होता त्यासंबंधी शाहूराजाच्या कार्याचा आशय समजून घ्यायचा असतो. स्वराज्याची पहिली पूर्वअट होती ती हिंदु मुस्लीम एकजुटीची. शाहूराजाने आपल्या संस्थानात हिंदु मुस्लीम एकतेचा जो आदर्श घालून दाखवला त्याला संबंध भारतात तोड नाही. त्याचे तपशील शाहूचरित्रात जरुर पहा. दुसरा स्वराज्याचा प्रश्न् होता तो सवर्ण व मागासजातीतील संघर्षातून मार्ग काढण्याचा. शाहूराजाने अस्पृश्यता निर्मूलनाचा जो मापदंड आपल्या संस्थानात घालून दिला तो सर्वोच्च असा आदर्श आहे. याचे तपशील देखील शाहुचरित्रात ठायीठायी आढळतात. तिसरा जो प्रश्न होता तो संस्थानांचे लोकशाही भारतातील स्थान काय असणार याचा. शाहूराजाने आपल्या उभ्या कारकीर्दीतच आपली भूमिका ‘विश्वस्ताची‘ असल्याची उदाहरणे घालून दिलेली आहेत. याचेही सर्व दाखले देत शाहूचरित्र समोर आहे. गांधीजीना अपेक्षित असणारी विश्वस्ताची ही भावना शाहूराजा आयुष्यभर जपत होता, असे म्हटले जाते. शाहुराजाचे हे मोठेपण व महानता पचवण्याची क्षमता आपण कधी कमावणार?
भारतीय लोकशाहीच्या एका चौथ्या आयामाचा निर्देश केल्याशिवाय शाहूराजाच्या कार्याची पुरी ओळख होणार नाही. १९३१ च्या कराची कॉंग्रेसने भारतातल्या कामगार-शेतकऱ्यांना शोषणातून मुक्तीचे वचन दिले, आणि या वर्गांनी असीम त्याग करून ब्रिटिशांना हाकलून देणारी लढाई पंधरा-सोळा वर्षातच यशस्वी करून दाखवली. कामगार चळवळ अजून बाल्यावस्थेतच असताना शाहूराजा मुंबईच्या कामगार वस्त्यात जाऊन त्यांना जर्मनी आणि रशियात जोर करत असलेल्या कामगार चळवळीचे राजकीय महत्त्व विषद करून सांगायचा. कामगार-शेतकऱ्याची शोषणमुक्ती झाल्याशिवाय खरी लोकशाही प्रस्तापित होऊ शकत नाही, हे या महामानवाने ओळखले होते. क्रांतीच्या यात्रेकरूला या वाटाड्याला वाट पुसल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
:- उमेश सूर्यवंशी
(उमेश सूर्यवंशी हे एक औद्योगिक कामगार असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.)
