मी आणि पु. ल.

एका छोट्या गावातून दहावी पास करून मी सांगली ला 11वी ला ऍडमिशन घेतलं. नवीन लोक , नवीन वातावरण , जमवून घेणं अवघड जायचं .
पहिल्यांदाच घरापासून बाहेर राहिल्यामुळं नोकिया चा बटनाचा मोबाईल भेटला होता. घरी संपर्क करण्यासाठी कमी आणि मन रमवण्यासाठी त्याचा खरा उपयोग !

त्या मोबाईल मध्ये ‘मरणादारी’ नावाची एक ऑडिओ कथा होती . गावठी भाषा , गावातली सगळी व्यक्तिचित्रण , कथाकाराची आवाजफेक यामुळं ती कथा खूप आवडायची. वाचनाची आवड आधी पासूनच होती पण कथा ऐकायला मजा यायची. पण बऱ्याचदा तेच तेच ऐकून कंटाळलो आणि मी इतर कोणत्या कथा सापडतात का हे बघू लागलो .

Youtube बद्दल एवढं माहिती नव्हतं. गूगल ला मात्र मला एक वेबसाईट भेटली ज्यावर बरीच कथाकथन होती .तेव्हा पहिल्यांदाच मी पुलंच साहित्य अनुभवलं ! आणि तेव्हा मानगुटीवर चढलेली भूत अजून उतरलेली नाहीत . न उतरणारी च भुतं ही !

त्यावेळी जिओ चा उदय अजून झाला नव्हता. आणि इंटरनेट म्हणजे अगदीच महाग. आणि जवळ लिमिटेड पैसे ! मला आठवतंय तेव्हा वोडाफोन चा 20₹ ला 100MB डेटा यायचा. मग आठवड्यातून एकदा तो करायचा. पुलंची 2- 3 कथाकथनं आणि आणि 1-3 गाणी डाउनलोड करण्यात तो खर्ची व्हायचा आणि थोडबहुत फेसबुक !

अस करत मी पुलंच्या कथाकथानाची अक्षरशः पारायणे केली. अगणित वेळा ऐकली. जवळ जवळ पाठ च केली म्हणा! मग नंतर वपु आले , शंकर पाटील आले , व्यंकटेश माडगूळकर आले आणि कायमचे माझ्या जवळ राहिले ! त्या आयुष्याच्या नवीन वळणावर सर्व नवीन माणसांमध्ये मला ह्या लेखकांची पात्र जवळची वाटू लागली.

ज्युनिअर कॉलेज संपलं आणि मी पुण्यात आलो. फर्ग्युसन कॉलेज मध्ये ऍडमिशन झाल्यावर मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला की पुल शिकून गेलेल्या कॉलेज मध्ये आता मी पण शिकणार होतो! आता पुलंच्या साहित्याकडे थोडं जास्त लक्ष घातलं ! बटाट्याची चाळ ,असा मी असामी , व्यक्ती आणि वल्ली ,

खोगीरभरती , उरलं सुरल , अपूर्वाई…..!
पुलंच्या प्रत्येक कथाकथनाला विनोदाची झालर आहे पण त्याच बरोबर जाता जाता मनाला चटका लावून जाणार गारनिशिंग सुद्धा असत!
पुलंचे हरितात्या जस इतिहास जगत होते , तसच आपणही त्यांच्या कथा जगतो !

कधी अंतू बर्व्याचा फटकळ पण प्रेमळ स्वभाव आपल्याला हसवतो ,तर गोदी गुळवणीच्या लग्नानंतर डोळे टिपणारे चितळे मास्तर आपल्याला जुन्या प्रेमळ माणसांची आठवण करून देतात !
एकंदरीत काय , की जर तुम्ही अजूनही ह्या वेड्या माणसाचं साहित्य ऐकलं-वाचलं नसेल तर तुम्ही खूप मोठ्या आनंदला मुकताय !

:- टेरियन लेनिस्टर

Leave a comment